हवाईजादा
स्पप्न गगनभरारीचे

मला आठवतय लहानपणी शाळेत तास सुरू असताना अचानक कानाला भारदस्त आवाज भेदून जायचा आणि प्रश्न पडायचा की एवढ्या माणसांच वजन सोबत घेऊन विमान हवेत उडवण हे काही साधसुध काम नक्कीच नाही बुवा!.....
बारावी झाल्यावर काय करायच असा प्रश्न एखाद्याला विचारला तर "बघू"अशा धाटणीचे उत्तर आपण ऐकत असतो. मात्र एखादा विद्यार्थी बारावी झाल्यावर अमेरिकेत विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल होतो.अठराव्या वर्षी काॅलेजकट्टा एन्जाॅय करायच्या वयात, वैमानिक बनतो.१९व्या वर्षी मित्रांच्या मदतीने अमेरिकेत विकायला काढलेले विमान खरेदी करतो.तुम्ही ऐकताय ते स्वप्न वगैरे काही नसून महाराष्ट्रीयन अमोल यादवचा हा प्रवास आहे.विमान बनविण्याचे स्वप्न पाहणारा हा अवलिया लवकरच महाराष्ट्रात भारतात विमान बनवणारा 'मेड इन इंडिया' विमान बनवतो आहे (रामदेवबाबाच्या भाषेत शुद्ध देशी )
अमोल यादवचा जन्म मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबातला.वडिल बँकेत मॅनेजर तर आई गृहिणी.अमेरिकेहून वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन आलेला मुलगा "मी विमान बनवणार आहे"असे स्पष्ट सांगून टाकतो. आणि पाहता पाहता स्वतःच्या घराच्या गच्चीवर विमानबांधणीला सुरूवात करतो.१९९८ साली "थर्स्ट एअरक्राफ्ट कंपनी"सुरू करून १९ आसनी विमान बनविण्यास सुरूवात करतो.विमान बांधायच तर विमानासाठी लागणारा कच्चा माल हवा आणि सर्वात महत्वाच म्हणजे हवेत उडण्यासाठी लागणार इंजिन गरजेचे होत मग शोधमोहिम करून साधन मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली.अमेरिकेतून विमानाचे काही पार्ट आणण्यास अमोल यशस्वी झाले मात्र इंजिन अमेरिकेहून मागवण शक्य नव्हत यासाठी त्यांनी शक्तिमान या गाडीच्या इंजिनाचा वापर करण्याचे ठरवले.कुर्ल्यातील एका इंजिनच्या साध्या दुकानात या इंजिनचा पार्ट सापडला. मुख्य अडचण होती पैशांची.अमोल यांनी आईला विचारताच आईने पैसे अमोलच्या हातात हसत हसत ठेवले.विमानबांधणीच्या कार्यात जुंपून घेतल्यानंतर जेव्हा समजल की आईने स्वतःचे मंगळसुत्र विकून पैसे उभे केले तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर होतात. आणि यानंतर त्यांच्या स्वप्नांचा पंख मजबूत होतात.१९९८,२००३ या दोन वेळेस फसलेला विमानाचा प्रयोग २००९ साली यशस्वी होतो.२००५ साली जेट एअरलाईनमध्ये कंपनीत वैमानिक पदाची नोकरी सांभाळताना दहा वर्षातील सर्व पैसा त्यांनी या स्वप्नासाठी खर्च केला होता.जवळजवळ ४ ते ५ कोटी खर्च झाल्याचे जेव्हा अमोल सांगतात तेव्हा नक्कीच भल्याभल्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.बरं विमान अभियंता नसून फक्त टेक्निकल नाॅलेजच्या जोरावर विमान बांधण्याचे स्वप्न सत्यात उतरणार्या अमोल यांचे खरच कौतुक वाटते.
बर विमान बांधायच तर भलीमोठी जागा हवी पण मुंबईत माणसांना जागा नाही मग या वेड्या आणि स्वप्नाळू प्रयोगाला जागा कशी मिळणार? मात्र यादव यांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर या बांधणीला सुरवात केली.विमान तयार होत पण त्याची नोंद कशी घेणार यासाठी भारतातील किचकट अशा प्रक्रियेला सामोरे जाव लागणार होत.वेळ खर्च होत होता.दिल्लीतल्या विमान वाहतूक संचनालय (DGCA) कडे विमानला मान्यता मिळविण्यासाठी खेपा मारून काहीच साध्य होत नव्हत.शेवटी अमोल यादव थकले.स्वप्नांचे पंख छाटले गेल्याच दुःख असतानाच अचानक "मेक इन इंडियाच्या"मुंबईतल्या प्रदर्शनात विमानाच प्रदर्शन करण्याची संधी भेटते आणि यानंतर अमोल यादव या नावाला जगभरात प्रसिद्धी मिळते.नुकत्याच झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये अमोल आणि सरकार यांच्यात करार झाला असून ३५ हजार कोटी आणि पालघरमध्ये १५० एकर जमिन अमोल यांच्या कंपनीला मिळणार आहे.८० करोड किंमतीचे विमान अवघ्या ५ कोटीत बनवता येऊ शकते. असा दृढविश्वास अमोल यांच्या मनात असून लवकरच भारतात पहिल्यांदाच विमान निर्मिती कारखाना उभा राहत आहे.
विमान उड्डाणाची चाचणी कशी होणार? सहा आसनी विमाने बांधून फुकटचा खर्च सरकार करत आहे का ? असे प्रश्न नक्कीच पडू शकतात मात्र या वेड्या ध्येयातून १० हजार नवी रोजगारनिर्मिती उभी राहणार असून भारताची संरक्षण आणि अर्थव्यवस्था नक्कीच दृढ होऊ शकते.असा विश्वास अमोल यांना आहे. अमेरिकेत दरवर्षी ८०० नवीन विमान रजिस्टर केली जात असताना भारतासारख्या देशात मात्र सत्तर वर्षाच्या काळात एक विमान बनविण्याचा किंवा तसा प्रयत्नही झालेला नाही याचा नक्कीच खेद वाटतो.
अमोल यांनी आपल्या विमानाचे नाव VT-NMD अर्थातच "व्हिक्टर टॅन्गो-नरेंद्र मोदी देवेंद्र" असे ठेवले असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यादव यांनी नक्कीच केला आहे.आता गरज आहे ती अमोल यादव यांना सरकारच्या सहकार्याची ती नक्कीच पूर्ण होईल अशा आशावाद.
राईट बंधूंच्या या शोधाची सुरवात पुराणात आधीच पुष्पक विमानातून झालेली असून चौपाटीवर शिवराम तळपदे चाचणी घेतली होती हा वाद जुना असला तरी भारतात विमान बनविण्याच्या नव्या इतिहासाला सुरवात झालेली आहे भविष्यात या "अमोल यादव" या माणसाची इतीहास नक्कीच नोंद घघेल याबाबत सर्वजण साशंक आहेत तूर्तास या हवाईजाद्याला मानाचा मुजरा.............
शुभम काकडे