
रोज पहाटे चारला उठायच रिक्षाने धावत जाऊन लोकल पकडायची त्यात सेंट्रल लाईनचा प्रवास म्हणजे मरण्याआधी वर्षश्राद्ध घालणे अशी अवस्था....
अस्सल मुंबईकराला यात वेगळेपण काहीच नाही वाटणार तसच मलाही ते हळूहळू वाटेनास झाल.
दादरला उतरल्यावर टाटा हाॅस्पिलला जाणारी शेअरींग टॅक्सीसाठी पहाटे पाचपासूनच लांबच्या लांब रांग लागते.खिशाला परवडत नसेल तरिही प्रायव्हेट टॅक्सी करून हाॅस्पिटलकडे धाव घ्यायची कारण प्रश्न जीवाचा असतो......
थोड्या वेळात तुम्ही हाॅस्पिटलच्या खाली पोहचता आणि तुम्हाला मळमळायला सुरवात होते.हातपाय तुटलेली,नाकातून नळी कोंबलेली,केमोथेरपीने काळवंडलेले असंख्य देह उघड्यावर पडलेले असतात.
आजूबाजूला त्यांचे नातेवाईक हातात कुठल्यातरी ट्रस्टचा कागद घेऊन केविलवाण्या नजरेने हाॅस्पिटलची फाईल चाळत असतात.पैसे नसल्याने ट्रीटमेंट थांबलेली असते.आजूबाजूला नाष्ट्यासाठी बादलीत हात घालून पीठ कालवणारा आणि तशाच हाताने डोसे बनवणारा बिहारी,महाराष्ट्र झुणका भाकर केंद्रावर झुणका भाकर सोडून इतर सर्व प्रकारच्या डिशेज विकणारे उत्तर भारतीय, वीस रूपरात जेवण मिळणार्या गाड्यावर पेशंटची गर्दी,दहा रूपयात ताक विकत घेणारे,टाईमपास म्हणून शेंगदाणे,फुटाणे तोंडात टाकत टाकतच हाॅस्पिटलच्या आत प्रवेश होतो.
गोल्डन ज्युबली,होमी भाभा,न्यू बिल्डींग,अनेक्स,सर्विस ब्लाॅक अशा वेगवेगळ्या हाॅस्पिटलच्या बिल्डींग एकमेकांना चित्रविचीत्र पद्धतीने जोडलेल्या पहायला मिळतात.
ब्लड चेकअप,सोनोग्राफी,सिटी स्कॅन,ऑपरेशन थिएटर,ओपिडी,न्युट्रीशिएशन,स्टोमा क्लिनीक,फिजीयोथेरपीस्ट वगैरे वगैरे विभांगाच्या बाहेर असणार्या बाकांवर गेली कित्येक वर्ष वेटींग करणारी माणस बघीतली की पोटात गोळा उठतो.युट्युबवर पेशन्स आणि एकाग्रता शिकणार्यांसाठी ही माणस आदर्शच ठरतील.......
जनरल वाॅर्डमधून औषध आणण्यासाठी पळत पळत मेडीकल स्टोअरला जायच टोकन घ्यायच औषध हातात पडेपर्यंत कधीकधी दिवस निघून जातो आल्यावर
औषध आणायला उशीर झाला म्हणून नर्सची बोलणी खायची........
दररोज डझनभर माणस समोर मरताना बघायचो.पहिल्या दिवशी जेवण जायच नाही पण हळूहळू सवय होते.माणस मरण नेहमीची गोष्ट बनून जाते,संवेदना मरून जाते.......
मिळेल तिथून दूध आणून घशातून बाहेर काढलेल्या नळीतून पेशंटला खायला घालायच, उलट्या आल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडायच,आधीच ताप आलेला असताना एसीच्या हवेत गारठून गारठून शरीर हातभर उडायच तरिही शिपायापासून डाॅक्टरांपर्यंत सगळ्यांची बोलणी खायची कारण अपमानापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो.......
राहायची अडचण म्हणून फुटपाथवरच कित्येक महिने संसार मांडायचा थोडेफार पैसे असले तर ट्रस्टकडून बांद्र्याच्या आसपास रूम शोधायची शेवटी लांब कुठेतरी खारघरलाच रूम भेटायची मग प्रवासाच भाड आणि पेशंटची फरफड लक्षात घेता फूटपाथवरच रात्र काढायची.अशा रात्री वाढत जातात आणि पेशंट शेवटच्या घटका मोजू लागतो.
ऑपरेशन थिएटरबाहेर वाट पाहून थकलेले नातेवाईक कधीकधी पेशंटला हाॅस्पीटलमध्येच सोडून गावी पळ काढतात काहीजण उपचार अर्ध्यावर थांबवून आयुर्वेदीक थेरपी घेतात.हाॅस्पिटलच्या चिरफाडीपेक्षा बुवाबाबाचा झाडपाल्यावर विश्वास बसायला लागतो.....
शेवटी रेल्वे टिकीट कन्सेशन्स मिळवण्यासाठी डाॅक्टरच्या पाया पडून सही घ्यायची,अपाॅयमेंट स्लीप काढायाची आणि रेल्वे तिकीट मदत केंद्रावर मदतीची अपेक्षा सोडून चारपाच बोलणी खाऊन कन्सेशन मिळवायच.....
परत शेअरींगने दादरला यायच.सिएसटीवरून एक्सप्रेस पकडून घरी यायच....
कर्जतचे दोन वडापाव खाऊन पोटभर पाणि पिऊन पोट भरवारच आणि आयूष्य अशाच बिनभरवश्या नियतीवर सोडून पुढे चालत राहायच......
शुभम काकडे