"गाभ्रीचा पाऊस" चौकटीबाहेरचा सिनेमा
चार चौकटीत बंदिस्त फक्त नाटकी कथानकाचा मुलामा शेतकरी प्रश्न हाताळणारे जवळजवळ सर्वच चित्रपट दिग्दर्शक लावताना दिसतात परंतु या चौकटीच्या बाहेर असणारी माणस,शेतकरी,शेतीप्रश्न, कुटुंबव्यवस्था,विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ आणि या दुष्काळाला समर्थपणे तोंड देणारी माणस "गाभ्रीचा पाऊस"या चित्रपटातून दिग्दर्शक सतिश मनवर आपल्यासमोर उभी करतात तेव्हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून तो लिट्रेचरचाही भाग असतो हे प्रेक्षकांसमोर अधोरेखित होते.
पाऊस ढगाळ,गोडगुलाबी,रंगिबेरंगी असतो हे लहानपणापासूनच बिंबवलेल असतानाच आपल्याच आजूबाजूची काही माणस त्याला गाभ्रिचा(गाबडीचा) म्हणून शिवी देतात.तेव्हा चित्रपटाविषयी एक गूढ बनून राहत. अलका(सोनाली कुलकर्णी) व किसना(गिरीश कुलकर्णी)यांनी साकारलेली पात्र चित्रपटाला वेगळ्या उंचिवर घेऊन जातात.दत्तप्रसाद रानडेंच संगीत तर दासू यांची अप्रतिम गीते काळजाचा ठाव घेतात.
आत्महत्या कशासाठी केली अशी चौकशी चालू असते तेव्हा फासावर लटकलेल्या भास्करचा बाप "शेतकरी कूठ सांगून आत्महत्या करतो का?" असा उलटप्रश्न करतो तेव्हा प्रेक्षकांचा मेंदू या पहील्याच सीन पासून काम करायला लागतो.
दोन वर्षापासून दुष्काळ असला तरिही कर्ज काढून अलकाच मंगळसूत्र गहाण ठेवणारा किसना दुबार पेरणी,आस्मानी संकट अशा चहुबाजूने त्रस्त झालेला असतो.नवरा आत्महत्या करू नये म्हणून स्वतःहून शरिरसुख देणारी अलका जेव्हा पाहतो तेव्हा या घटनेवर नक्की कस व्यक्त व्हाव ते समजत नाही.फक्त आपल्या शरिरावर बधीरता जाणवत राहते.भास्करच्या कुटूंबाला सरकारी मदत मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड,किसनाच्या मनाची नकारात्मक बाजू म्हणून रेखाटलेला बांधावरचा पाटील,क्रिकेट मॅचपेक्षा हवामान खात्याच्या अंदाजावर लक्ष्य ठेवणारी माणस आणि हे सगळ घडत असताना चित्रपटाच्या वास्तवाला धक्का न लावता आलेला विनोदी बाज,चित्रपटाची जमेची बाजू ठरते.अजय गोगावले व विठ्ठल उमप यांनी गायलेली चित्रपटातील दोन्ही गीते कथानकाशी उत्तम मेळ साधतात.तसेच चित्रपटाचा शेवटही अपेक्षेप्रमाणे भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.
एकंदरित दिग्दर्शन,कथा,संगीत,विनोद आणि अभिनयाबरोबरच वास्तवता रेखाटणारा "गाभ्रिचा पाऊस" अशा सगळ्या गोष्टी जमून आल्याने परिपूर्ण ठरतो.शेवटी जर या प्रश्नांची उकल झाली नाही तर चित्रपटातील एका बोलक्या संवादासारखा महाराष्ट्राची फोड करताना पश्चिम महाराष्ट्र-कोकणातून विदर्भ आणि मराठवाड्याला नक्कीच वगळावं लागेल नाही तर सरकारवर शिव्यांचा पाऊस पडायला जास्त वेळ लागणार नाही .......
शुभम काकडे
