उत्तर द्याव लागेल

      उत्तर द्याव लागेल



     पायातल्या भेगांना प्रश्न पडलाय
चिखलमातीच्या वाटा तुडवत
मला तुझ्या जगण्याशी एकरूप होता
येईल का?????

प्रवासाचा शीण यावा
डोक्यावर ऊन पावसाचा मारा झेलताना
डोक जड व्हाव,
पोटाच्या आतडीला चालून चालून
भला मोठा खड्डा पडावा.
टाळ पिटून पिटून
हाताला गठ्ठे यावेत
अन शेवटी
तुझ सावळ रूप काळजाच्या
भिंतीवर तरळल की शरीराच्या कणाकणातून
उर्जा भरावी....

वारकरी वाटांवर चालत नाहीत
ते तर वाटा निर्माण करतात.....

तुझ्या ओढीन माणस
कळवळतात
रडतात
भांडतात
चालतात आणि
दमल्यावर थांबतात देखील... .

तुझ्या नावाच्या घोषावर ठेका धरताना
त्यांच्या चेहर्यावर नजर फिरवली
तर सुख म्हणजे काय असत
याचा साक्षात्कार होतो......

हे सगळ खर असल तरी
पाऊस पडत नाही
शिवार फुलत नाही
उघड्या पडलेल्या पडीक
जमिनीवर नांगर फिरवून
माणस तुझ्याकड दयावया करायला येतात
प्रश्न विचारतात
विठ्ठला
तुला मात्र उत्तर द्यावच लागेल......

मनाची घालमेल व्हावी
मान अपमान आयुष्याचा सारा भूतकाळ  डोळ्यात साठवून
 तुझ्या सहवासात मनमोकळ व्हाव
पण आमच्या या परिस्थितीला कारणीभूत कोण??
याच उत्तर तुला द्यावच लागेल...  

हसण्या बागडण्याच्या काळात
लहानपण परिस्थितीच्या विस्तवावर
भाजून निघाव...
या लहानग्यांच
 हसण
खिदळण
बागडण
  कुणी मारून टाकलय?
याच उत्तर विठ्ठला तुला द्यावच लागेल......

                   शुभम काकडे