महामंडळाच नव माॅडेल

महामंडळाच नव माॅडेल



             एसटी महामंडळाच्या गाडीकड बघीतल की महाराष्ट्राच दरिद्रीपण लक्षात येत अशी अवस्था...जुनाट रंग,गंजलेल्या खिडक्या,पोरापोरींनी फाडलेल्या सिट्स कोरलेली लैला मजनूंनी नावे शंभरच्या स्पीडने गळणारा टप आणि कधीपण ब्रेक डाऊन होणारे गाडीचे इसवीसन पाचव्या शतकातले टायर्स....
तर सध्या कर्जान बेजार झालेल्या महामंडळाची नवीन एसटी माॅडेल बारामती स्टॅन्डवर लागली नेहमीप्रमाणे पुण्यामुंबईला जाणाऱ्यांसाठी असलेल्या बसेस असल्याचे समजून आम्ही आमची कर्मदरिद्र्या निरा-बारामती बसची वाट पाहू लागलो.नीट निरखून पाहील्यावर पाटीवर निरा लिहील होत.पण एसटी पूर्णतः रिकामी होती.सगळेजणच कन्फ्युजनमध्ये नक्की चढू का नको?अशा एसटीला पास चालतो का?तिकीट वाढवून घेत्याल राव?अशा प्रश्नांनी बेजार केल.शेवटी एसटीत प्रवेश केलाच(मोक्कार नाही तिथ डोक लावायची सवयच हाय म्हणा) लगेचच ड्रायव्हर येऊन "बसून घ्या आपलीच बस हाय"असा आविर्भाव आणत एसटीच्या चाकावर(साॅरी स्टेअरिंगवर) बसला.प्रवासी आत घुसले आणि दुबई बघीतल्यासारखी एसटीला न्याहाळू लागले.पोरांनी फोटोसेशन वगैरे करून घेतले.सदा न कदा खुन्नस देणारा कन्डक्टर हा इसम आज मात्र गाडीत आल्यावर एअरहाॅस्टेस सारख स्मीत हास्य करत प्रवाशांचे स्वागत करू लागला.पण भाषेत काहीच चेंज नव्हता म्हणजे "पोरांनो पास काढून ठेवा एसटी चेक व्हणार हाय"या नेहमीच्याच टोन मध्ये........
            विशेष म्हणजे प्रत्येक स्टाॅपवरचे पेपर देऊन आलेल्या पोरांना आश्चर्याचा धक्का बसला की खेडवळ एसटीच हे नवीन कुठल माॅडेल?शेवटी कन्डक्टरला बसा बसा आपलीच एसटी हाय(चेहऱ्यावर सेम स्मितहास्य)अस ओरडून सांगाव लागल.ड्रायव्हर देखील आज आपली बस असल्यासारख वागत गाडी मोक्कार पळवली नाही की गाड्यांना कट देऊन रायडर असल्याच सिद्ध केल नाही.नेहमी कसले बसले आवाज काढणारी पोरही थक्क होऊन गपगुमान बसून राहीले याचा विशेष आनंद
         करोडो रूपये खर्च करून रडारडीच्या सिरीयल्स आणि २० व्या शतकातले पिक्चर्स महामंडळाने Voot go सारख्या वायफाय कीटवर अपलोड केल्या(यातही डेरिमिल्क कॅडबरीवर डान्स करणाऱ्या बायांची जाहीरातच पाचपन्नास वेळा बघावी लागते) मात्र "प्रवाशांच्या सेवेसाठी"या आपल्या ब्रिदवाक्याशी प्रामाणिक राहायच असेल तर अशा अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाड्यांवर महामंडळाने खर्च केल्यास प्रवाशांच्या महामंडळाला बसणार्‍या शिव्याशापात कमतरता होईल एवढे मात्र नक्की...........
       
           शुभम काकडे