हेच अमुचे मागणे


                        हेच अमुचे मागणे


       महिनाभर पायाला भिंगरी बांधून फिरल्याचे सत्कार्य म्हणून वायरल फ्ल्यू वाढदिवसाच्या दिवशीच शरीराला चिकटला.अंगात ताप असण ही तशी भारी फिलींग असते पण नंतर जाम फाटायला लागल्याने दुखणे अंगावर काढायची गोम तशीच ठेऊन हो नाही करता करता हॉस्पिटल गाठलेच.

हाॅस्पिटलची एकूण अवस्था पाहता याला खुरवडा हा एकच शब्द तंतोतंत जुळू शकला असता.डाॅक्टरांचा चेहराही सीबीआयच्या नोटीसीने भांबावलेल्या राजसाहेबांसारखा पिवळंधमकं  पडला होता(शब्दांची अतिशयोक्ती वगैरे ) बर आत जाणारा प्रत्येक पेशंट डाॅक्टरांची भली मोठी सुई घुसल्याशिवाय बाहेर येत नव्हता.ही सुई आपल्यालाही आभाळाला चार बोटे टेकवल्याशिवाय  सोडणार नाही या विचाराने अजूनच फाटायला लागली.
शेजारी एका खुर्चीवर बसलेल्या एका बाईवर अचानक नजर खिळून  गेली.केस उडालेली, चेहरा काळवंडलेला, अगदी शरीरावरच प्रत्येक हाड दिसून येत होत.मांस नावाचा प्रकारच तीच्या शरीराला नव्हता.मेंदूत झिणझीण्या आल्यासारखं झालं.चार वर्षातल्या  कित्येक आठवणी डोळ्यासमोर पिंगा घालू लागल्या.कॅन्सर नावाचा आयुष्य उध्वस्त करून टाकणारा  हा आजार आता सहजासहजी ओळखता येतो.बाहेरच्या बाकावर तीची सून कावरीबावरी होऊन सासूची जगण्याची केविलवाणी धडपड डोळ्यात साठवून अस्वस्थ होती.

बराच वेळ बोलू की नको या संभ्रमातूनच "कोणता कॅन्सर आहे?" एवढाच प्रश्न तीच्या सूनेला विचारला."घशाचा आहे" हे प्रत्युत्तर देताना त्या बाईच्या मनातील भिती स्पष्ट जाणवत होती म्हणून जरा धीरानच विचारलं  "ताई काळजी करू नका बरा होईल.केमोथेरपीने थोडा त्रास होतोच पण नंतर अगदी सगळ ठीक होईल.ट्रीटमेंट कुठे चालूय?"
 विश्वासाच्या या सूरान त्या बाईलाही बर वाटल "बार्शीला केमोथेरपी चालूय पण दादा दहा लाखांवर खर्च झालाय" यानंतर पेशंटला जेवण करत जा घाबरू नका.अवघड केसेसही नीट होतात असा धीर देताच ती सूनही भरभरून बोलू लागली "तुम्हीच सांगा आता.खुपच घाबरतात आई, जेवण करत नाही आणि सारखं टेंशन घेत बसतात" पेशंटकडे बघत मी माझा संवाद सुरूच ठेवला "काकू अजिबात काळजी करू नका आता ही नाॅर्मल गोष्ट झालीय फक्त खात पीत जावा केमो संपला की लगेच तुम्हाला बर वाटेल." हे बोलताच  दोघींनाही बर वाटल.हसतच आम्ही एकमेकांना निरोप दिलाञ.

हे सगळ आख्यान सांगायच कारण हाॅस्पिटलात बसलेली कित्येक माणसं त्या पेशंटकडे परग्रहवासी असल्यासारखे पाहत होते यामुळ त्या दोघी बायांची  अस्वस्थता अवघडलेपण स्पष्ट दिसत होता.बायकांना टक्कल असणं, शरीर काळवंडलेल पडणं, तोंडात नळी असणं, मेंदूची कवटी फुटलेली हातापायांनी लुळीपांगळी असणारी ही माणसं मृत्यूची संघर्ष करत ट्रिटमेंटच्या आशेवर जगत असतात.बाहेरच्या जगात वावरताना प्रचंड मोठा न्यूनगंड घेऊन ही आयुष्याला सामोरी जात असतात. अशा वेळेस त्यांना आधार देणं हे आपलंच काम असतं.बर ते जमणार नसेल तर निदान वेडवाकड तोंड करून अशा माणसांचं खच्चीकरण करू नका एवढेच सांगणे....
बाकी 'उबूंटू' मधील या ओळी अशा वेळेस सार्थ ठरतील
  
    "हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे...
    माणसाने माणसाशी माणसासम  वागणे..."

                                शुभम काकडे