जन्माची 'फेसाटी' झालेल्या वर्तमान पिढीस...



            धनगर समाजाचं चित्रण कधी नव्हे ते मराठी माध्यमक्षेत्रात  येऊ लागलं. चित्रपट, मालिकामधून या समाजाचा जीवनपट उलगडला जाऊ लागला. जाहिरातविश्वाचा आणि नाट्य रूपांतरणाचा मुलामा देऊन मात्र अतिशय बाळबोधपणे हे चित्रण पडद्यावर दाखवू लागले. 'ख्वाडा' सारखा चित्रपट मात्र याला अपवाद आहेच. 

बाकी मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून 'बनगरवाडी' या व्यंकटेश माडगुळकरांच्या कादंबरीचा उल्लेख केला जातो. बनगरवाडी या समाजाच्या समस्या आणि प्रश्नांभोवती फिरत असली, तरिही मास्तरांच्या भूमिकेतून कादंबरी लिहीली गेल्यानं या मांडणीत जिवंतपणा वाटत नव्हता.

जत तालुक्यातला नवनाथ गोरे 'फेसाटी' कादंबरी लिहीतो आणि मराठी साहित्याची राहिलेली कसरही भरून काढतो. अस्सल धनगरी जगणं स्वतःच्या भूतकाळाला खोदत सुंबरानाच्या आख्यानात बांधतो. म्हणूनच युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'फेसाटी' ही कादंबरी न राहता वर्तमान पीढीची घुसमट ठरते. 

कर्नाटकाच्या सीमेला लागून असलेलं सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातलं निगडी खुर्द गाव. 
मोठा अपंग भाऊ, चार बहिणीनंतर पाठी झालेला नवनाथ. 
कुळस्वामी 'खरसोंडी' सिद्धनाथला नवसं बोलून झाल्यावर दोन वर्षांनी पोरं झाल म्हणून देवाच्या पुढ्यातच 'नाथबाबा' नाव ठेवलं जात.

पोटभर खायला भेटत नाही म्हणून रानातली पातरीची भाजी अन जिगळी गपागपा खाऊन दोन तांब्या पाणी पिऊन पोट भागणारी नवनाथची आई. पोरानं शाळा शिकून कामाला लागावं म्हणून भाकडं जनावर विकणारा बाप,

अपंगाच प्रकरण मार्गी लागून कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी सरकारी खेटा मारणारा नवनाथचा थोरला दादा.
रोजंदारीवर जाऊन घरखर्चाला हातभार लावणारी आणि लग्नानंतर सख्ख्या मामीनं विहिरीत ढकलून दिलेली सुंदाक्का, धाकट्या भावाला शाळेत भूकं लागल म्हणून कोरभरच भाकरं खाणारी आणि मार खाऊनही नवनाथवर तेवढाचं जीव लावणारी नंदाताई,

दारू गुटखा तंबाखू चोरीमारीतला नवनाथचा सहकारी दगड्या या सगळ्यांच्या जगण्यातून 'फेसाटी' ला आकार येतो. धनगर समाजाची संस्कृती, प्रथा, राहणीमान, जगण्यासाठीचा संघर्ष नाथाच्या जगण्यातून उलगडत जाताना आपण त्याच्या पात्रात कधी हरवून जातो हे कळतही नाही.

फेसाटीत दडलेल्या अनेक समस्या, प्रश्न आणि वास्तवाचं जाळ वाचकाला स्वस्थ बसू देत नाही हे देखील तितकंच खरं. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा अभाव, अवकाळी पावसाचा हैदोस, भावकीचा वाद, अल्पभूधारकांच्या जगण्याची फरफड, अंधश्रद्धेचं जाळं, सामाजिक वर्गसंघर्ष, व्यसनाधिनता आणि मरगळलेली शिक्षणव्यवस्था या प्रश्नांनी 'फेसाटी' ओतप्रोत भरलेली दिसते. 

'जस भोगल अगदी तसच लिहीलं' गेल्यानं काही वेळ वाचक म्हणून घुसमट होते आणि लेखकाच्या साहित्यशैलीच कौतुकही वाटतं. सुंबरानाच आख्यान नाथाचं जगणं उभ करतच पण फेसाटीची भाषा जत परिसराच्या बोलीभाषेच्या संपन्नतेच दर्शनही घडवत.

अस्मानी संकटाशी दोन हात करता करता ज्याची उभी हयात मातीमोल झाली. परिस्थितीनं ज्यांच्या घशास कोरडं पाडली त्यांना लेखक ही कादंबरी अर्पण करतो. यावरूनच कादंबरीचा आवाका लक्षात घेता येईल. 

शेवटी, जन्माची फेसाटी झालेल्या वर्तमान पिढीला ही कादंबरी अस्वस्थ करेल एवढं मात्र नक्की...


फेसाटी ( युवा साहित्य अकादमी पुरस्कार २०१६)
नवनाथ गोरे
अक्षरवाडःय प्रकाशन, पुणे 


शुभम काकडे