माणसं खुप घाण तुटतात. नजरेआड होतात. भयानक लेव्हलच दुःख देऊन निघून जातात. पण कधीकधी जन्मापासून भावनिक पातळीवर होरपळून निघालेली काही माणसं बघीतली की जगण्याला नव्यानं पालवी फुटते...
औसा तालुक्यातल्या लताआक्का असलच काहीस अजब मिश्रण. साठीच्या घरात पोचलेल्या अक्काच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. केमो देऊनही काहीही फरक पडला नाय म्हणून आक्काला गोळ्या देऊन डॉक्टरांनी रामभरोसे सोडलीय.
तरूणवयातच हातपाय छाटलेली, शरीर काळवंडली, एकटक हॉस्पिटलच्या छताकडं बघून आत्महत्या करण्याचा तासनतास विचार करणाऱ्या कॅन्सरग्रस्त पोरापोरींच्या दुःखापुढं अक्काच्या दुःखाचं काय एवढं? पण खरंच अक्काचं प्रकरण वाटत इतकं सोपं नाहीये...
लातूर जिल्ह्यातल्या दुष्काळी औसा तालुक्यात आक्काचा जन्म झाला. दोन वर्षाच्या आतच बाप वारला. एकुलत्या एक आक्काला मायनं लाडानं वाढवलं. आई सोबत आक्का डोंगरानं फिरून लाकूडफाटा गोळा करून पोट भरायची. असंच पोट भरायच्या नादात वणवण फिरताना साप चावून आईसुद्धा वारली...
पोरक्या अक्काचं काय होणार असं गावकऱ्यांना वाटत असतानाच आजीनं एक चांगली जागा बघून आक्काचे दोनाचे चार हात करून टाकले. सासर हा आक्काच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता.
जन्मापासून पोटासाठी वणवण करणाऱ्या आक्काचा नवरा सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर होता. पंधरा वर्षाचा संसार झाला ना झाला तोच आक्काचा नवरा हार्ट अॅटॅकमध्ये गेला. सुखदु:खाच्या लुपहोल्समध्ये आक्काची गाडी पुन्हा एकदा अडकून पडली.
यावेळेस मात्र तीच्या आधाराला तीचा मुलगा होता. घरातल्या या कठिण काळात त्यानं आक्काला फुलावाणी जपलं. नवऱ्याच्या जाण्यानं झालेल्या पोकळीत त्यानं आक्काला कधीच एकट पडू दिलं नाही. आता मुलाच्याच जीवावर आक्का आपलं जगणं पुढं रेटत होती.
आक्काचा मुलगा कुवैतला जॉबला लागला. भरभक्कम पैसा मिळू लागला. पोराचं लग्न लावायचं एवढंच टार्गेट तीच्या डोळ्यासमोर बाकी होतं. कुवैतहून आक्काला भेटायला घरी जात असताना मेगा हायवेवर त्याचा अपघात झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन प्रेत घाटात पडल्यानं आक्काला पोराला शेवटचं बघताही आलं नाही.
सासरा सासूही मधल्या काळात वारले. आक्कानं यानंतर काय केलं हे मात्र तीनं सांगितलं नाही. जास्त काही विचारायचं माझही धाडस झालं नाही. आजारपणाबद्धल विचारल्यावर आक्कानं मात्र सगळं काही एकदम व्यवस्थित सांगितलं.
सात वर्षापासून किडनीचा त्रास होता. सगळं औषधपाणी करूनही काही फरक पडेना. खासगी दवाखान्यात एकदोन सर्जरी झाल्यानं म्हातारपणासाठी ठेवलेली पुंजीही संपून गेली. आयुष्यात माणसांच्या जाण्यानं होरपळून निघालेल्या आक्काही खचली आणि थोड्याफार गोळ्या घेऊन गावी परतली.
कोरोनाच्या काळात परत बेक्कार त्रास होऊ लागला. पण सगळं काही बंद. एकटीला कुठं हालचालही करता यायची नाय. शेवटी कुजकं का होईना पण जगायची आशा तीला स्वस्थ बसू देईना. म्हणून आक्कानं टाटा हॉस्पिटल गाठलं. स्कॅनच्या रिपोर्टमध्ये दोन्ही किडन्या फेल झाल्याचं डॉक्टरांनी तीला स्पष्ट सांगितलंय.
अवघड म्हणजे कमरेवर हंडा घेऊन पाण्यासाठी रोजची पायपीट करावी लागल्यानं आक्काला हे सगळं उद्भवल्याचं तीनं सांगितलं. कुठून काहीतरी मदत मिळेल म्हणून आक्कानं आता मुंबईतल्या एनजीओपुढं हात पसरायचं ठरवलंय. पण मरताना मला सुखानं मरायचंय एवढीच काय ती तीची इच्छा बाकीय...
संध्याकाळच्या आठच्या आसपास माझा टोकन नंबर आल्यानं धावतपळत जाऊन दादरला पळालो. फास्ट लोकल पकडून दारापाशीचं गर्दीच्या रेट्यात उभा राहिलो. अंधारात प्रकाशानं उजळून निघालेल्या सेंट्रल लाईनच्या बिल्डींग, डब्यात एकमेकांच्या अंगाला चिकटून उभी राहिलेली माणसं सगळं काही निर्जीव वाटू लागलं..
आयुष्य पुढं रेटत राहणाऱ्या या गर्दीतही आक्काची जगण्यासाठीची धडपड डोळ्यासमोरुन कधीच जाणार नाही एवढं मात्र नक्की...
शुभम काकडे
