बागेतली कविता

            "बागेतली कविता"
                             
नेहमीचीच बाग
चुरगळलेल्या स्वप्नांच्या पालापाचोळ्यावर
तू गजरा माळायचीस अन मी कविता....
आज अचानक माझ्या हातात
तू गजरा दिलास तू मात्र
कविता टिपू लागलीस कागदावर....
तासभर रेंगाळला
तुझा कागद कोरा
मी ही तुझी संदर्भहीन नजर
न्याहाळताना गजरा माळायचा विसरलो...
अलगद तुझा हात हातात घेऊन
"माझ्या डोळ्यात बघ
सापडेल कदाचीत कविता"
असं काहीसं बोलून गेलो
नजरेला नजर भिडताच
तुझे हात कागदाकडे सरसावले...
कदाचित तुझ्या मनातला
पालापाचोळा उडून गेला असेल........
               शुभम काकडे