"उंबरठ्या-आत की गर्भात"
      

'निरागस'
या शब्दाची
उकल व्हायच्या वयात
सहन करावे लागतात
          बाई,
   आपल्याच नात्यातील लालभडक रंगाच्या बुबुळातून केले जाणारे बलात्कार....
तुला बाळसं आल की, फिरवले जातील प्रेमाचे हात गालावरून....
पण लक्षात ठेव ?
त्याचा गालांना अजून बरेच ओरखडे सहन करायचेत.
   रांगता रांगता उभी राहशील
     पडशील, पिटुकल्या पावलानं उभी राहशील         पुन्हापुन्हा
आधाराला कोणाचातरी बोट धरशील....
पण सांभाळून बाईपणाची जात आपली ?....
तेच बोट तुझ्या चारित्र्यावर शंका घेऊ शकतं ?
कळत्या वयात
उगाचच मधून मन भरून आलं
आनंदाने किंचाळशील तर दाबला जाईल आवाज, धावशील तर जखडले जातील पाय,
प्रतिकार करशील तर विद्रूप केला जाईल चेहरा,
मग तरफडशील आर्त किंकाळ्यांनी गजबजून जाईल गाव.
'तो'?
वारा जाऊ देणार नाही तुझ्या किंकाळ्या समाज नावाच्या व्यवस्थेपर्यंत...
तुझा आवाज कुठल्या कुठे विरून जाईल..
हळूहळू पुसल्या जातील अत्याचाराच्या पाऊलखुणाचारित्र्याचे ठसे क्षणार्धात उमटतील मातीवर,
वातावरणात बदल म्हणून शिंपडल जाईल सुगंधी अत्तर
तू मात्र शोधत राहशील                
              सुरक्षितता
उंबरठ्या-आत?
         की
            गर्भात?
       
                   शुभम काकडे