साठी
साठीच्या घरात आलो
पाय होते थकलेले...
चेहर्यावरती सुरकुत्या,
केस होते पिकलेले...
प्रेयसी माझी खाट,
आधाराला काठी होती...
अधूनमधून तोल जायचाच
आयुष्यातली साठी होती...
तारुण्यातल्या गोष्टी आता
नातवंडांना सांगत होतो...
दूधभात भरवून त्यांना
त्याच्यांसोबत रांगत होतो...
पाठीचा ताठपणा साठीमध्ये
कुजला होता...
छातीमधला ढाण्यावाघ
काळाबरोबर बुजला होता...
डोळे जरी अंधारलेले तरी
पाझर त्यांना फुटत राहतो...
भूतकाळातल्या आठवणींना
मनामध्ये कुटत राहतो...
खोकल्याची ती उबळ नकळत
काळीज माझे फाडत जाते...
कधी नव्हे शरीर माझे
दुखणे अंग काढत जाते.....
अर्धा रस्ता पार केला
आता मरणापर्यंत पळण होत..
जगण झाले खुप आता
सरणावरती जळण होत....
शुभम काकडे
