"पावसावरची कविता"
पाऊस पडल्यावर धसकट गोळा करायला गेलेली माय,
परक्या घरी लाकडं फोडून घाम गाळणारा बा,
गळक्या छपरातून पडणारा पाऊस
मडक लावून झेलत बसलेली बारकी,
गृहपाठाची वही हाताशी धरून झापडीतून एकटक पाऊस टिपत बसणारा सदा मात्र वेगळा भासत होता....
मास्तरानं "पावसावरची कविता" लिहून आणायला सांगितली होती म्हणे.
पानावर केव्हापासून
गिरवत बसला होता सदा...
काही केल्या
शब्द जुळत नव्हता,अर्थ कळत नव्हता,
कधीकधी कोर्या पानावर दिसायची
सुरकुतलेली माय,
घामाजलेला बाप..
हात थरथर कापत होता पण,
पाऊस कवितेतून झिरपत नव्हता....
मास्तराची छडी वाचावी म्हणून बिथरलेला, घामाजलेला सदा घरदार फाटक असतानासुद्धा
पाऊस जोडत बसला होता तुकड्यातुकड्यांनी....
नुकत्याच पुसटश्या ओळी सुचल्या असतील त्याला
भरभर लिहून काढल्या होत्या त्याने कागदावर.....
अचानक माय समोरून आली होती धसकट घेऊन, थकली-भागली माय उंबरठा ओलांडताना पोराबाळांच भुकेनं
सुकलेली तोंड पाहून लगोलग चुलीकडे शिरली...
मक्याच पीठ भाजून पाण्यात टाकून खायचा बेत होता आज.
बारकी आणि सदा तुटून पडले होते पीठावर.
कवितेची वही मात्र सदा पडवीतच विसरला होता....
पावसानं भिजून गेली होती वही,
शब्दसुद्धा पुसट झाले होते
शेवटी पाऊस सदाच्या कवितेत झिरपला होता....
सदा मात्र पाऊस, कविता, वही, सगळं विसरून गेला होता....
त्यानंतरही पाऊस कित्येक तास तसाच रेंगाळत थांबला होता पडवीत.....
शुभम काकडे