असुमल ते आसाराम


                              
सध्या पाकिस्तानात असणार्या पंजाब प्रांताच्या बिरानी गावात १७ एप्रिल १९४१ ला असूमल हरपलानीचा जन्म झाला.फाळणीनंतर गुजरातेत स्थायिक झालेल्या असुमलच्या वडीलांचा मृत्यू झाला आणि घरदार चालवण्यासाठी मॅजीस्ट्रेटच्या बाहेर असूमल चहा विकू लागला.लहानपणापासून धार्मिक असणार्या असूमल वयाच्या १५ व्या वर्षी घरातून पळून आश्रमात आला.बळजबरी करून शेवटी त्याला घरी आणून "लक्ष्मी देवी "सोबत लग्न लावण्यात आले.नारायण आणि भारती लक्ष्मीपासून झालेली असूमलची दोन अपत्ये.
असूमलने "लिलाशाह"यांना आध्यात्मिक गुरू बनवून सेवा करू लागला.लिलाशाह यांनी प्रसन्न होऊन असूमलचे नामकरण आसाराम ठेवले.अहमदाबादपासून १० किमी अंतरावर मुटेरा गावात आसारमने झोपडीतला साधा आश्रम बनवला.आसपासच्या गावातली माणस आसारामचे भजन -किर्तन ऐकायला आश्रमात येत.लोकांना आकर्षित करण्यासाठी आसाराम मोफत औषध पुरवी आणि किर्तनानंतर जेवणही देई हळूहळू आसारामची पत वाढू लागली मुलाच्या सोबतीने जगभरात ४00 आश्रम,४ कोटी अनुयायी आणि जवळजवळ १० हजार कोटींची संपत्ती कमावणारा आसाराम भारतीय जनतेचा बापू झाला.
             आध्यात्मिक गुरू म्हणून जनमानसात नावारूपास आलेल्या आसारामच्या मुटेरा आश्रमातील दोन बालकांचा मृत्यू झाला.आश्रमातील मुलींसोबत गैरवर्तन केल्याची प्रकरणे समोर येतानाच आज तक मिडीयाने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये तणावमुक्तीसाठी महिला पत्रकारासोबत रात्री झोपण्यासाठी केलेली विचारणा असो.निर्भया बलात्कार प्रकरणात देश निर्भयाच्या बाजूने असताना "टाळी एका हाताने वाजत नाही.पिडीतेने आरोपींना भाऊ म्हणूण दयामया करायला हवी होती" असा विक्षीप्त सल्ला देतो तेव्हा आसारामच्या अल्पबुद्धीची कल्पना येते.आश्रम बनविण्यासाठी जमीन हडप करण्याच्या बर्याच प्रकरणात आसाराम अडचणीत आला होता.एवढच काय तर आसारामचा मुलगा नारायण साईच्या पत्नी जानकीने लग्नानंतरही आश्रमातील साधीकांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला.लैंगिक संबंध ठेवलेली एक साधिका गर्भवती असल्याचे समजल्यावर नारायणने दुसरे लग्न करण्याचे जानकीला विचारले.घटस्फोट देऊन लग्न करू शकता असा इशाराच जानकीने दिल्यावरही नारायणने तीच्यासोबत लग्न केले असून त्यांना मुलगा असल्याचे सांगितले.प्रकरण इथेच संपत नाही तर आश्रमातील एका मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नारायण साई सध्या सूरतमधील लाजपोर जेलमध्ये कैदेत आहे.नारायणसाई  सुद्धा स्वतःला आध्यात्मिक गुरू मानत असून त्याचेही भक्तगण असून नारायण साई ढोंगी असल्याची टिप्पणीही जानकी करते
           अशा बर्याच संकटांत अडकलेल्या आसारामची भक्तमंडळी तरिही आपली आंधळी श्रद्धा आणि विवेकबुद्धी आसारामच्या चरणी घाण ठेवून होते.आसारामच्या आश्रमात ७ कर्मचार्यांच्या हत्या प्रकरणीही अहमदाबाद सत्र न्यायालयात खटला चालू आहे मात्र २०१३ सालच्या एका प्रकरणाने आसारामला कायमचा जेलबंद करण्यात आला.उत्तर प्रदेशच्या शहाजहाॅनपुर मधील आसारामचे निस्सिम भक्त असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या खर्चाने शहरात आसारामच्या नावे आश्रमही बनवला होता.भक्ताची १६ वर्षाची मुलगी आजारी पडल्यावर उपचारासाठी आसारामच्या गुरूकुलात गेले.भक्ताची मुलगी आसारामच्याच छिंदवाडा आश्रमात शिक्षण घेत होती. मुलीवर भूत पिशाच्चाने झपाटले असल्याचे सांगून १४ ऑगस्टला भक्तासोबत संपूर्ण परिवार आसारामला जोधपूरला भेटले.१५ ला मुलीच्या उपचारासाठी जोधपूरनजीकच्या आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला यानंतर फरार आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली.धक्कादायक म्हणजे पिडीत मुलगी शिक्षण घेत असलेल्या छिंदवाडा आश्रमाची संचालिका व वाॅर्डन संचिता गुप्ता आणि सहाय्यक शरदचंद्र यांनी आसारामच्या या कृत्याला साथ दिल्याचे स्पष्ट झाले.१९ मार्च २०१७ मध्ये जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालू झालेला खटला १६ डिसेंबरला एससी-एसटी प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.७ एप्रिलला या प्रकरणाचा शेवटचा युक्तीवाद पार पडला आणि  २५ एप्रिलला निकालात आसारामला जन्मठेप तर संचिता व शरदचंद्र यांना आरोपीला साथ देण्यासाठी २० वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा दिली.याप्रकरणात साक्षीदार असणार्या ११ लोकांवर आसारामकडून वार करण्यात आले असून बर्याच लोकांची हत्या देखील करण्यात आल्या आहेत.बलात्कार प्रकरणात साक्षिदार असणारे आसारामचे फॅमिली डाॅक्टर प्रजापती,आश्रमातील  कर्मचारी अखिल गुप्ता,राजू चंदोक यासोबत आसारामच्या जवळीक असणारे कृपाल सिंग,दिनेश गुप्ता,महेंद्र चावला  यांचा संशयास्पद हत्या करण्यात आल्या आणि आसारामच्या कुटुंबाचे फोटो काढणारा राकेश पटेल आणि इतर साक्षीदारांवर जीवघेणे वार करण्यात आले यावरून आसारामच्या आध्यात्मिक धर्मगुरूच्या चेहर्यामागची काळी बाजू समजू शकते.इतकच काय तर पिडीत कुटुंबावर भक्तांकडून धोका असल्याने पोलींसाकडून बंदोबस्त करण्यात आलेला असून आसाराम बापूचा खरा चेहरा जगासमोर आलेला असला तरिही भक्तमंडळी निकालाच्या दिवशी आसारामच्या फोटोचे पूजन,होमहवन करत असल्याचे बघीतल्यावर खरच प्रेमापेक्षा धर्मातील श्रद्धा खूप आंधळी असते हे कळून चुकले.
                 
              "जब पाप का घडा भरता है तो उसका कोई साथ नही देता"आसारामच्या पुस्तकातल्या या ओळीच त्याच्यासाठी तंतोतंत लागू होते.१९९० पासून २००० सालापर्यंत काॅग्रेसी,बिजेपी आणि इतर सर्वच पक्षांचे नेते आणि विवीध क्षेत्रातले मान्यवर आसारामच्या पायाशी लोळण घेत असत मात्र सध्या बिजेपीला आडवाणींचा सोयिस्कर रित्या विसर पडल्याप्रमाणे आसारामला सध्या राजकीय भक्त वर्गाकडून वाळीत टाकण्यात आले आहे.दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आसारामच्या पायावर माथा टेकले होते आणि "मला कोणी ओळखत नव्हत तेव्हापासून बापू माझ्या सोबत आहेत असून आसाराम बापूंना भेटून आंतरिक उर्जा मिळते"असे विधान केले होते (अर्थातच हीच ऊर्जा विदेशातून फिरताना खर्च केली जाते)मोदीच नव्हे तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण आडवाणी,नितीन गडकरी इ बिजेपीवाले आणि कमलनाथ,दिग्विजय सिंग इ काॅग्रेसवाले मंडळी की ज्यांची यादी खूप मोठी आहे ते आसारामचे निस्सिम भक्त होते.आसारामकडे असणारी "आंधळी मतदार जनता" हाच राजकारण्यांचा स्वार्थ ..आसारामचे राजकीय भक्त,जनतेच्या सेवकांनी आणि एका काळचे निस्सिम भक्तांनी मात्र या प्रकरणात दिर्घकालीन मौन बाळगले आहे.
           कठुआ,सुरत,उन्नाव,नगर आणि जवळजवळ देशाच्या प्रत्येक भागात मुलींवर होणार्या अत्याचार आणि बलात्काराची प्रकरणे ताजी असतानाच लोकांना चारित्र्य आणि संस्काराचे पाठ शिकवणारे आसाराम आणि त्याच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंकडून अशा प्रकारची कृत्ये घडत असतील तर भारताच्या समाजमनाच्या विकृतीची कल्पना करणे अवघड आहे.
शेवटी असा"राम"समाजासाठी घातक असून भक्तांच्या डोळ्यांवरची आंधळी पट्टी बाजूला केले तरच कदाचित बदल घडू शकतो.......
                  

                    शुभम काकडे