महाराष्ट्राची ऐतिहासिक नगरी कोल्हापूरपासून अवघ्या २० किमी अंतरावर असणारा निसर्गनिर्मीत आणि पर्णालदुर्ग म्हणून ओळखला जाणारा पन्हाळा....
प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला किल्ला पूर्वी नाग जमातींच्या लोकांकडे होता यालाच पूर्वी पाली भाषेत पन्नग्नालय म्हणून ओळखले जात.विशेषः म्हणजे याच किल्ल्यावरून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला.पन्हाळ्याला सिद्धी जौहरने वेढा दिल्यावर शिवाजी महाराज शिताफीने विशाळगडला निसटले.बाजीप्रभू देशपांडे यानी घोडखिंड लढवली तर शिवा काशिद(प्रतिशिवाजी) याने शिताफीने आदिलशाहीला चकवा दिला.इतिहासाची ही पाने सर्वांना परिचीत आहेच.......
स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली जात असताना १६७३ च्या आसपास आदिलशाहीच्या तावडीत असलेल्या किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या गावांतून रयतेवर होत असलेला अन्याय आणि स्त्रीयांवर होत असणारे अत्याचारांच्या घटना वाढत असताना, स्वराज्याभिषेक करायचा असेल तर पन्हाळा स्वराज्याला जोडायला हवा, या इच्छेने 'कोंडाजी फर्जंद' या सरदाराच्या मदतीने जीवावर उदार होऊन अडीच हजार आदिलशाहीच्या फौजेशी लढण्यासाठी अवघे ६० मावळे जातात, आणि अवघ्या साडेतीनतासाच्या लढाईत आदिलशाहाच्या किल्लेदाराला पाडून पन्हाळा सर करतात.पन्हाळा विजयाचा मोलाचा वाटा असलेल्या सरदार कोंडाजी फर्जंद याच्या पन्हाळा मोहिमेचा हाच जीवंत अभिनय पट "फर्जंद" आपल्या समोर दिग्पाल लांजलेकर या नवदिग्दर्शकाच्या नजरेतून साकार होतो तर अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते आहेत..
चित्रपटात फर्जंदच्या भूमिकेत असलेल्या हिंदी अभिनेता अंकित मोहन याची रांगडी भाषा आणि एकूनच फर्जंदसाठीची मेहनत दिसून येते.महाराजांच्या भूमिकेत असलेला चिन्मय मांडलेकर प्रत्यक्ष महाराजांच्या प्रतिमा डोळ्यासमोर उभा करतो. मृणाल कुलकर्णीने साकारलेली जीजाऊ आणि सतत सोंग बदलणारा आणि महाराजांचा गुप्तहेर बहिर्जी नाईकला प्रसाद ओक यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे .बेशक खानच्या भूमिकेत असणारा समिर धर्माधिकारी अंगावर काटा उभा करतो तर केसरच्या भूमिकेत असलेली मृण्मयी देशपांडे अभिनय आणि नृत्यातून प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते.गणेश यादव(तानाजी मालुसरे) निखिल राऊत(किसना)प्रविण तरडे(मारत्या रामोशी) आस्ताद काळे (गुंडोजी) हरिश दुधाडे(गणोजी) राहुल मेहंदळे(अनाजी पंत) यांच्या अभिनयाच विशेष कौतुक कराव लागेल.
१७ व्या शतकाच्या दृश्यासाठी चित्रपटात वापरलेले विएफेक्स इफेक्ट,प्रत्येक क्षणाला चित्रपटाशी बांधून ठेवणारे पार्शसंगीत,उत्तम मेळ बसलेली गाणी आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत उलगडत जाणारे कथानक याला पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील.पात्रांच्या तोंडी असणारे संवाद हे ऐतिहासिक प्रसंगातीलच वाटतात.सुरवातीला लय पकडलेला चित्रपट मध्यांतरानंतर भरकटलेला वाटतो, परंतु मोहिमेसाठी केलेल्या मावळ्यांच्या तयारीच्या प्रसंगात चित्रपट विनोदी आहे की काय अस वाटण हेच दिग्दर्शकाच यश म्हणायला हव कारण चित्रपटाच्या कथानकात विनोदाचा वापर करण हे जरा धाडसाच काम होत आणि दिग्दर्शाने ते उत्तमरीत्या साधल. चित्रपटाचा शेवट भव्यदिव्य आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणार आहेच. "फर्जंद"हा दिग्दर्शकाचा पहीलाच प्रयोग असल्याचे कधीच जाणवत नाही कारण प्रत्येक प्रसंगातील भव्यदिव्यता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.....
शिवाजी महाराजांच्या इतिहासपटातील न उलगडलेला एका "कोंढाजी फर्जंद' नावाच्या अवलिया सरदाराचा प्रवास उमजून आणि समजून घ्यायचा असेल तर प्रेक्षकांना फर्जंद उत्तम पर्याय ठरतो..........
शुभम काकडे
