"उल्फत ए अहत ए बैत से 'आगाह'
हैदराबाद हो गया है दिल..."
माणसानं हैदराबादमध्ये जावं आणि शहराच्या प्रेमात पडावं हे अगदी साहजिक आहे. बहामनी साम्राज्याच्या ताब्यात असलेल्या हैदराबादला कुतुबशाहाच्या काळात नवा चेहरा मोहरा प्राप्त झाला. पंधराव्या शतकापासून आजतागायत या शहराच्या गलीबोळात इतिहासाच्या कित्येक घटना ठसलेल्या आहेत. हैदराबादमुळे आंध्रप्रदेशला आर्थिक व सांस्कृतिक उभारी मिळाली. भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर मात्र 'आंध्रा' अस्वस्थ झालेलं पहायला मिळतय. आंध्रप्रदेशपासून काडीमोड झालेल्या तेलंगणाला आयती पोटगी म्हणून 'हैदराबाद' शहर मिळालं. कित्येक वर्ष या राजधानीच्या अंगाखांद्यावर खेळून धष्टपुष्ट झालेल्या आंध्राला मात्र नाईलाजास्तव नवीन राजधानीची शोधाशोध करावी लागली. हैदराबाद सोबतच्या आठवणी पुसून टाकतानाच सत्तारूढ सरकार राजधानीसाठी तीन शहरांशी सूत जुळवू पाहतय. या राजधानी प्रकरणाचा घेतलेला हा रंजक आढावा...
आंध्रप्रदेशाच विभाजन होऊन 'तेलंगणा' राज्याची २०१४ मध्ये निर्मिती करण्यात आली. तेलुगू भाषिक राज्याच्या लढ्याला शेवटी यश आल होत. सगळ काही आलबेल असतानाच हैद्राबाद शहरही तेलंगणाला जाऊन मिळालं. राजधानीचं गमवावी लागल्यानं आंध्रवासीयांनी लढा पुकारला. या प्रकरणावर शेवटी तोडगा म्हणून 'आंध्रप्रदेश पुनर्घटना करार' लागू करण्यात आला. या करारानुसार दहा वर्षांसाठी हैद्राबाद या दोन्ही राज्यांची राजधानी म्हणून काम करणार आहे. आंध्र सरकारला नवीन राजधानीचा विकास करण्यासाठी एवढा काळ असणार आहे. राजधानीसाठी शहराची निवड करण्यासाठी सरकारकडून शिवराम कृष्णन कमिटीची स्थापना करण्यात आली. कमिटीचा सोपस्कार पार पडून सूचना द्यायची त्याआधीच चंद्राबाबू नायडू सरकारने 'अमरावती' शहराची नवीन राजधानी म्हणून घोषणा केली.
विजयवाडा व गुंटूरच्या मध्ये सुपीक जमीन असल्यामुळे या भागात राजधानी असू नये अशी सूचना कमिटीकडून आली. अमरावती शहर नेमके याच भागात येत होत. गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ असलेल्या चंद्राबाबू सरकारने तर अमरावती राजधानी माॅडेल तयार करण्यासाठी परदेशी दौरे, शेतकरी बांधवांकडून जमीन हस्तांतरण, ब्ल्यू प्रिंट इ. वगैरे प्राथमिक क्रियाविधीही पार पाडला. 'सरकारी काम आणि चार दिवस थांब' अशी परंपरागत प्रथा असतानाही चंद्राबाबू सरकार मात्र याबाबत सरकारी खाक्या दाखवत तातडीने काम करत होत. १३ हजार कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात घोषीत करून बांधकामाला सुरवातही झाली. एवढचं नव्हे तर राजधानीचा दिमाखदारपणा वाढविण्यासाठी बाहुबलीच्या सेटसारखीच अमरावतीची रचना करायची म्हणून चक्क दिग्दर्शक एस.राजामौली यांनाही चंद्राबाबू महाशय भेटून आले. 'अमरावती' शहर राजधानी बनण्यासाठी नटून थटून बसलेलं असतानाच चंद्राबाबू सरकारचा म्हणजेच तेलुगू देसम पक्षाचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. अमरावतीला राजधानी बनवण्याच चंद्राबाबूंच स्वप्न धूळीत जाण्याचे संकेत या पराभवामुळे अजूनच गडद झाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू सरकारचा पराभव करत वायएसआर काँग्रेस सत्तारूढ झाले. स्पष्ट बहुमताचा आकडा जगनमोहन रेड्डींनी मिळवल्याने पहिल्या दिवसापासून 'वायएसआर' चंद्राबाबू सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी डावपेच आखू लागली. अमरावतीची विकासकामे तातडीने बंद करण्यात आली. नवीन राजधानी म्हणून चक्क तीन शहरांची निवड करण्याचा अजब पवित्राच रेड्डी सरकारने घेतला. विशाखापट्टनम, कर्नूल व अमरावती अशा एक नव्हे तर तीन राजधान्या असणारं आंध्रप्रदेश हे भारतातील आगळवेगळ राज्य ठरणार होत. सरकारच्या या धोरणामुळे विशाखापट्टनम ही कार्यकारी राजधानी (विधीमंडळ), कुर्नूल नगरविकास राजधानी तर अमरावती विधी राजधानी (उच्च न्यायालय) म्हणून नावारूपास येईल. विकासकामांच विकेंद्रीकरण व्हावं यासाठी हा निर्णय घेतल्याच वाएसआर कडून बोललं जात आहे.
वाएसआर सरकारने नुकतेच तीन राजधान्यांचे हे विधेयक विधानसभेतही पारीत केले. विधानपरिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यावर राज्यपालांच्या सहीने यावर कायद्याची मोहर उमटणार आहे. राजधानीचा हा प्रवास 'ट्रॅजडीमय' असताना विधेयकाचा सोपस्कार सुरळीत पार पडला असता तरच नवल...कारण,विधानपरिषदेत वायएसआर ला स्पष्ट बहुमत नाही. वाएसआर ने शक्कल लढवत या विधेयकाला विरोध करत असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या १७ आमदारांवर चक्क निलंबणाचीच कारवाई केली आहे. विधानपरिषदेत तेलुगू देसमचे संख्याबळ कमी करण्याचा हा रडीचा डावच म्हणावं लागेल. चंद्रबाबूंनीही महत्वकांक्षेला धक्का लागल्याने आंदोलनाचा विरोधी पवित्रा घेतला आहे. सचिवालय, विधानसभा बाहेरील मोर्चे, लाठीचार्ज, जाळपोळ अस सगळ काही आपल्याला 'आंध्रा' मध्ये डोळसपणे आजमितीला आणि यापुढेही पाहता येईल. 'आंध्रा'ची राजधानी कोणती यावर सध्या काही अंदाज बांधण तस अवघड काम आहे.
तूर्तास, राजकीय सत्तानाट्याचा हा कुरघोडींचा डाव चालूच राहील, पण राजधानीविषयी नागरिकांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. नवीन राजधानीचा स्वीकार कसा केला जाईल माहीत नाही, पण आंध्रवासीयांना हैद्राबादी जगणं सहजासहजी विसरून जाता येणार नाही, एवढ मात्र नक्की...
शेवटी शहराच्या प्रेमात पडलं की भावनिक होण स्वाभाविक असतं...
शुभम काकडे
