साधेपणा.....
साधी माणसं
साधी स्वप्न
बोलण्यातला चालण्यातला आणि लिहीण्यातला साधेपणा.....
अगदी साध आयुष्य जगायचय मला.....
हाती बंदूक धरणाऱ्या प्रत्येक बंदुकधाऱ्याला साधेपणानेच गोळी चालवून द्यायची बरं का?....
प्रतिकार करायचा नाही,
भडक लिहायच नाही,
उगाचच तुम्ही उठून दिसता
आणि तुमचा भडकपणा
डोळ्यांना खुपत जातो त्यांना.....
तुमची आमची आयुष्य वेगवेगळ्या धाग्यांनी गुंफून गेलीयेत हो
तुमचा धागा मुलायम होता तुमच्या तळहातासारखा....
आमचा मात्र हातावर गठ्ठे पडावेत असा निगरगट्ट झाला होता..
कितीही साध लिहायच ठरवल ना
तरी भूतकाळ आड येतो,
डोळ्यांसमोर फेर धरू लागतो,
वेशीबाहेरच्या मटन शाॅपमधील जावेदच्या हातातल्या सुरीचा शिताफीपणा येतो माझ्या हातांना....
शब्द ,वाक्य, अर्थ, सारं काही गडद होऊन जात...
उगाचच आयुष्याचा भडकपणा जगाला दाखवला म्हणून आपणच आपल्याला दुःख द्यायच आणि वाहून द्यायचा रंग डोळ्यातून.....
नाही आता ठरवलयं साधेपणा सोडायचा नाही ....
शब्दातून फुल उधळायची...
पण नाही
फाटकी घोंगडी शिवायची झाली
तरी टोचून घ्यावच लागतच....
खरच नाही राहता येत साधेपणाने
कारण
आतून बाहेरून
शांततेन भरलेला बुद्ध नाहीये मी..
शुभम काकडे