पंढरपुरला कधी गेला नाही
पण भर उन्हात बाप
संसारगाडा चालवायचाI
तेव्हा त्याच्या शरिराची काळीकुट्ट सावलीतच
माझा पांडुरंग भेटायचा......
माझ्या आईच्या खरबुड्या हातांचा स्पर्श होत नाही आता सहसा
कारण घरातल्या विठ्ठलाची सेवा करण यातच ती रमून गेलीये.....
माझा विठ्ठल थकून गेलाय
जगण्याचा कंटाळा आलाय
माझ्याकडे ढसाढसा रडलाय विठ्ठल,
कारण कमरेवरती हात ठेऊन
संसाराचा विस्कटलेला डाव
त्याच्याकडून पाहवत नाही.....
भक्तांची गर्दी नसतेच कधी
माझ्या विठ्ठलाच्या बाजूला,
आणि त्याची तशी इच्छाही नसते
कारण रूक्मिणीच प्रेम त्याला पुरून उरत..............
असा माझा साधाभोळा
पांडुरंग माझ्या काळजात घर करू लागलाय...
आयुष्याच्या शेवटची वारी काढताना
माझ्या डोळ्यातून आसव नसतील,
तर माझ्या आयुष्यातील त्याच्या अस्तित्वाच्या खुणा असतील.....
पापणी ओली झाली की
काळजातल्या पांडुरंगाची खोली मला जाणवत राहील आयुष्यभर...........
शुभम काकडे