"भेट"
ऑफिसवरून निघायला उशीर झाला आणि रमेशला दरदरून घाम फुटला.ऑफीसमधून पायी,दादर वरून सहाची लोकल,दहाबारा स्टाॅपनंतर गर्दीतून उतरायच आणि रिक्षा धरून परत स्टाॅपवरून अर्धा तासांची पाईपीट म्हणजे तब्बल दोन तासांची रडारड म्हणायची.....
रमेश भरभर शेवटच्या मेल्स पाठवू लागला.ऑफीसमधून बाहेर पडतानाच काहीतरी सरप्राईज घ्यायच पक्क करून स्टेशनच्या रस्त्याला लागला.
आज जर उशीर झाला तर नेहा परत भेटायला पण तयार व्हायची नाही याची जाणिव रमेशला होतीच . शेवटी खूप कष्टान तीचा रूसवा गेला होता अजूनही आहेच म्हणूनच तर हा प्रपंच........
बुक स्टाॅलवर बराच वेळ पुस्तक चाळल्यावर एक पुस्तक शेवटी पसंत पडलच.नेहाच पुस्तक प्रेम ठाऊक होतच मग यापेक्षा दुसर गीफ्ट कशाला?पादचारी पुलावरून चालताना जीवाचा आटापीटा करणाऱ्या पोटट्याकडून गजरा विकत घेतला.पानात बांधलेला गजर्याचा सुगंध रमेशच्या छातीत आणि नकळत अंगावर फुटलेला काटा तसाच पहील्या भेटीसारखा........
दोन लोकल गर्दीच्या भयाण रेट्यान सोडाव्या लागल्या.शेवटी अपंगाच्या डब्यात घूसल्यावर किमान श्वास घ्यायला भेटला पण तसही 'प्रेमात माणूस मनान अपंग होऊन जातोच की' असा काहीसा विचार आला की रमेशला स्वतःचच हसू आल.आपल हे असच हसण नेहाला जाम आवडत.चौपाटीवरच्या अंधाऱ्या रात्री दोघेच सागराकड बघत असताना घेतलेल्या तिच्या रसाळ ओठांच चुंबन....बास आता जास्त आठवणी नकोच......
नेहाचा विचार करायला लागला की रमेश असाच तरल वाहवत जातो.त्याला त्याच भान राहतच नाही.आजूबाजूचा सगळा गोंधळ प्रश्न हतबलता असली तरिही काही क्षणांकरीता म्यूट होत आणि तो तीच्या जाणीवांशी एकरूप होतो.....
लोकलमधल्या घाम चिकटलेल्या डझनभर माणसांच्या तांड्यातून शेवटी रमेश बाहेर आला.थोडी पायपीट करताच नेहाची बिल्डींग लागली.आता मात्र धडधडीचे ठोके चालतानाही कान भेदून जात होते.साला असल्या प्रेमाने मरून जाईन एके दिवशी असल काहीबाही त्याच्या डोक्यात येऊन गेल.लगेच डोक झटकून तो नेहाच्या दारासमोर ऊभा राहीलाच.अंगातल सार अवसान एकवटून त्यान डोअर बेल वाजवली.
केस मोकळे सोडून नुकतीच आंघोळ करून आलेल्या नेहाचा सावळा रंग उठून दिसत होता.अंगातला ड्रेसही शरीराला अगदी घट्ट चिटकून बसलेला.तिची नजरानजर झाली आणि रमेश विरघळून गेला.कधी एकदा मिठी मारून तीच्या ओठांशी भिडतोय अस त्याला होऊन गेल पण आज हात उचलत नव्हता.श्वास घट्ट रोखलेला आणि त्यात नेहाचा राग बाकी होताच.....
नेहान काही क्षण रमेशकड पाहील आणि मानेला लटका देत आत निघून गेली.रमेशला काय बोलाव समजल नाही.तो निमूटपणे तीच्या मागून आत चालता झाला.
"हे बघ तुझ्यासाठी राॅबीन शर्माच पुस्तक आणलय"
रमेशचा एकेरी संवाद सुरू झाला. पण पलिकडच्या स्वारीकडून प्रत्युत्तर नाही.वर्तमानपत्र चाळ,उठून येरझारा मार,गालातल्या गालात स्मीतहास्य मग अशा निरर्थक गोष्टी सुरू झाल्या.नेहा पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली.आता मात्र रमेशला रहावल नाही.
नेहा तुझ्यावर खुप प्रेम करतो.प्लीज पण हा रूसवा सोडून दे.मला माहीतीये कामाच्या व्यापात तुला भेटण होत नाही पण तू नेहमीच माझ्या जवळ असतेस अगदी कायमची.जीव खूप कासावीस झालाय आता तुझ्या मिठीशिवाय सगळ काही व्यर्थ आहे अस सगळ मनात ठेऊन ओठातून फक्त
"हा बघ तुझ्यासाठी गजरा"एवढच बोलू शकला. नेहा समजून गेली त्याच्या नजरेत सगळ काही स्पष्ट दिसत होतच.तीन क्षणभर कटाक्ष टाकला आणि ती रमेशला घट्ट बिलगली.रमेशने लडीवाळपणे तीच्या पाठीवरून हात फिरवत केसांना कुरवाळत हळुवार बोलला
"नेहा साॅरी परत तुला कधीच एकट पाडणार नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत"नेहाला अगदीच फिल्मी वगैरे वाटून गेल.ती लाडानेच त्याच्यापासून दूर झाली.गजरा केसात माळला.रमेशच्या डोक्यात मात्र विचारचक्र सुरूच.'एवढ्या सुंदर चेहर्याला लोक हिजडा म्हणून का बर हिणवत असतील?' नेहमीप्रमाणेच त्याने याही प्रश्नाला फाटा मारला.स्वतःच्या विचारावरच हसत तो नेहाकडे सरसावला आणि दोघे गादीवर पहुडले.यानंतर मोगर्याचा सुवास तसाच खोलीभर दरवळत राहिला ......
शुभम काकडे
(फोटो प्रतिकात्मक आहे)
