"एनसीआरचा"श्वास गुदमरतोय

    "एनसीआरचा"श्वास गुदमरतोय




फिरोजशहा कोटला मैदानातील टेस्ट मॅचचा दुसरा दिवस.लंच ब्रेकनंतर श्रीलंकन खेळाडू चेहर्याला मास्क बांधूनच मैदानावर आले.भारताच्या टीमला घाबरून उगाच खोटीनाटी कारण देऊन मॅच रद्द करण्याचा प्रयत्न श्रीलंकेकडून केला जातोय असा आरोप केला गेला आणि भारतीय क्रिकेट रसिकांची छाती गर्वाने चौपट फुगली.समजा आता त्याच छातीत जळक्या २५ सिगारेट सोडल्या तर?बापरे!...कल्पनाही करवत नाही ना? असच काहीस घडल होत.दिल्लीचा एअर क्वालिटी निर्देशांक मॅचच्या दिवशी २६९ होता.(सर्वसाधारण ५१- १०० असतो) एखाद्या धडधाकट माणसाचा जीव घ्यायला एवढी दूषीत हवा पुरेशी आहे आणि त्यात फिल्डींग करताना कराव्या लागणार्या धावपळीत जीव गुदमरणार नाहीतर काय होणार! श्रीलंकन खेळाडूंना श्वसनाचा त्रास होऊ लागला.जवळजवळ निम्याहून जास्त टीमला उलट्या झाल्या (यावेळी श्रीलंकेतील AQI होता फक्त ५७ ) असो.कॅप्टनने शेवटी खेळ थांबवला.विराटच्या भितीने लपून बसल्याने श्रीलंकन टीमवर टीकेची झोड उठलेली असतानाच दिल्ली एनसीआर मात्र अस्वस्थ होता.या घटनेला एक वर्ष होत आले तरी दिल्लीची अस्वस्थता कायम आहे उलट दिवसेंदिवस वाढत आहे.

  १९८५ साली नॅशनल कॅपीटल रीजन प्लॅनींग बोर्डने देशाच्या राजधानीचे क्षेत्र निश्चित केले यालाच दिल्ली एनसीआर(राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) म्हणून ओळखले जाते.उत्तर प्रदेश हरियाणा व राजस्थानच्या ४९ जिल्ह्यांचा समावेश दिल्ली एनसीआर मध्ये करण्यात आला.विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठा एनसीआर प्रदेश म्हणून दिल्ली एनसीआरचा उल्लेख केला जातो.राजधानी दिल्ली एनसीआरचा २५ टक्के हिस्सा व्यापते. जवळजवळ ४ करोड ७० लाख लोकसंख्येचा हे शहर अद्वितीयच म्हणावे लागेल.एवढ आख्यान सांगण्याचा हेतू हाच की दिवाळी सण जवळ आला की दिल्ली एनसीआर हा शब्द कानावर हमखास पडतोच कारण  याठिकाणी होणारे वायू प्रदूषण "NCR is equal to polution" हे नवीन समीकरणच जवळजवळ तयार झालय.तर होत काय की दिल्लीवर थंडीतल्या धुक्यासारखी दुषीत हवेचा थर जमा होतो.माणसांचे श्वास कोंडले जातात.दिवसाढवळ्या दाट अंधाराने दिल्ली परीसर गुडूप होऊन जातो लहान बालकांना फुफ्फुसाच्या त्रासापासून कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात,गर्भवती स्त्रीयांची वेळेआधी प्रसूती होते हे सगळ घडतय देशाची सूत्र ज्या महामहीम शहरातून चालवले जाते ते एनसीआर मधून.......

     जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच जाहीर केलेला हवा प्रदूषण संदर्भातील अहवाल यामुळेच धक्कादायक ठरतो.
जगभरात अवघ्या २०१६ या एका वर्षात ६ लाख बालकांचा मृत्यू हवेतील अतिसूक्ष्मकणांनी होत असून यातील भारतातील मृत पावलेल्या बालकांची संख्या एका लाखावर आहे म्हणजेच दर तासाला १२ मुलांचा मृत्यू या हवा प्रदूषणाने होतो. ५ वर्षाखालील बालकांचे मृत्यूचे प्रमाण पाहता भारत पहिल्या स्थानी तर नायजेरिया,पाकिस्तानचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.प्रगत राष्ट्र म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहेच.वायूप्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्त्रिया व लहान बालकांना बसतो.वेळेपूर्वी प्रसूती,गर्भपात कुपोषित बालके,फुफ्फुसाचा कर्करोग,ज्ञान क्षमता कमी व मानसिक विकास खुंटणे अशा गंभीर स्वरूपाच्या परिणामांनाही गर्भवती स्त्री व अर्भकांना सामोरे जावे लागते.लहान बालकांचा संपर्क जमीनीजवळ जास्त व श्वसनाची क्रिया जलद असल्याने अतिसूक्ष्म कणांनी ते सहजपणे प्रभावित होतात.प्रत्यक्ष दिल्ली एनसीआरची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर राष्ट्रीय कर्करोग संस्था व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल चाळल्यास समजून येईल की एनसीआर मधील तीन पैकी एका बालकाची फुफ्फुसक्षमता कमी होत असल्याचे आढळून येईल.छप्पन इंच की छाती जगभर मिरवणाऱ्यांना देशाचे भवितव्य असलेल्या या उद्याच्या तरूण पिढीच्या फुफ्फुसांची अवस्था दिसतेय की नाही ते मात्र देव जाणे....

     अस काय घडत की दिल्ली एनसीआर नागरिकांच्या जीवावर उठते? तर सर्वात मोठी राजधानी क्षेत्र असलेल्या दिल्ली एनसीआर आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी इंडस्ट्री हब सुरू झाली.दिल्लीच्याच्या आजूबाजूला तब्बल ४ हजार विटभट्ट्या आहेत.प्रदूषीत हवा उत्सर्जीत करणारे हजारहून जास्त उद्योग व्यवसाय तर भारतातील सर्वात मोठा बांधकाम व्यवसाय याच दिल्ली एनसीआरमध्ये चालतो. यासोबतच लोकांची तुंबड गर्दी वापरत असणारी लाखोंच्या घरातील खाजगी वाहने इ. मधून बाहेर पडणारे अतीसूक्ष्म कण (पार्टीक्युलेटमॅटर) पीएम २.५ हवेत मिसळतात या कणांचा आकार अवघे २.५ मीमी असल्याने ते श्वसनामार्फत सहजगत्या फुफ्फुसात जाऊ शकतात व श्वसनरोग ते कॅन्सर सारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकतात.
दिवाळी दरम्यान परिस्थिती तर आणखीनच गंभीर होते कारण उत्सवांच्या नावाखाली चंगळवादाचा बाजार मांडणारे लोक्स अशी काही फटाक्यांची आतिशबाजी करतात की जणू फटाका हा त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. तसही पर्यावरणाला भारतात थर्ड क्लास वागणूक दिली जातेच म्हणा.
तर दिवाळीत या पीएम २.५ ची हवेतील मात्रा  ५०० चा आकडा पार करते.जवळजवळ २५ जळक्या सिगारेटी एकाच वेळेला श्वसनारम्यान प्रत्येक व्यक्ती घेतोय असा विचार केल्यास या प्रश्नाची तिव्रता आपल्या लक्षात येईल.

    शेवटी करून धरून जनता मोकळी झाली की भारताच्या सर्वांगीण हितासाठी नेहमीच जीव तीळतीळ तुटणार्या  सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नेहमीप्रमाणे लक्ष घातले.दिवाळी दरम्यान ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचा अभूतपूर्व आदेश दिला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय पर्यावरण अनुसंधान संस्थेच्या मदतीने ग्रीन फटाके बनवले.फटाक्यांच्या तीन श्रेणी बनवून त्यात सल्फर व नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवण्यात आले तर फटाका फुटल्यानंतर त्यातून पाण्याच्या कणांचा फव्वारा विषारी वायूत मिसळून त्यांची तिव्रता कमी करण्यात आली.दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर काम करणारी एपीसीएने(Environmental Polution Control Agency) कठोर पाऊले उचलत १ ते १० ऑक्टोबर दरम्यान सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचा आदेश तर दिलाच आणि जर परिस्थिती पूर्ववत आली नाही तर खाजगी वाहनांवर बंदी घालण्यात येईल असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.सगळीकडून अंधार असताना प्रशासन मात्र एनसीआरमध्ये प्रचंड नागरी ताण सहन करत अहोरात्र झटताना दिसून येतेय.संपूर्ण एनसीआर परीसर ९९ टक्के पीएनजी गॅसवर चालवण्याच्या प्रयोगामुळे दिल्ली प्रशासन कौतुकास पात्र ठरतेच.रस्त्यावर पाण्याचा शिडकावा मारणे,दिवाळीच्या काळातील दहा दिवस सार्वत्रीक बांधकाम,विटभट्टी,डिझेल जनरेटर व कचरा जाळण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली.दिल्ली व केंद्र सरकारच्या ७० टीमा न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असल्या तरी दिल्लीकरांनी सगळ्या उपाययोजनांना टांग मारून रात्रभर फटाके वाजवून न्यायव्यवस्था आडवी आली तरी आम्ही आमची भारतीय मानसिकता बदलणार नाहीच असा मूर्खपणा ठामपणे दाखवून दिला.
     
   ग्रीनपीस अहवालानेही नायट्रोजनडायऑक्साईड उत्सर्जनातील जगभरातील हाॅटस्पाॅट जाहीर केले.विशेष म्हणजे यात दिल्ली एनसीआर हा सर्वात मोठा हाॅटस्पाॅट ठरला.हे सांगण्याचा हेतू एवढाच की N2O हवेतील  सुक्ष्मकणाच्या स्तर वाढीस कारणीभूत ठरतात.म्हणूनच दिल्ली एनसीआर राजधानीचे शहर न ठरता जीवघेणा' गॅस चेंबर' ठरतोय.स्काॅटहाॅमला संयुक्त संस्थानांचे पर्यावरण संमेलन पार पडल्यानंतर भारताने पर्यावरण जागरूकतेसाठी पर्यावरण संरक्षण अधीनीयम,पर्यावरण वाहिनी योजना,राष्ट्रीय जल निती,राष्ट्रीय पर्यावरण नीती,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड व वनाधीकार कायदा इ. सारखे सर्वसमावेशक कायदे राबवून थोडीफार पाऊले उचलली पण सर्वांगीण पर्यावरण विकासासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणे हीच महत्वपूर्ण गरज बनली आहे.
             निती आयोगानेही १५ सूत्री कार्यक्रम जाहीर केला असला, तरी त्याची अंमलबजावणी गरजेची आहेच.अन्यथा पर्यावरण मंत्रालयावर उद्योगधंद्यांना आडवे लाऊन पैसा खाणारी खाजगी संस्था असा शिक्का उरणार नाही.

    सध्या तरी भारताची राजधानी घुसमटतेय आणि ही घुसमट लक्षात घेऊन स्वच्छ भारतच्या वरवरच्या दिखाऊ योजना गांधीजींच्या चष्म्यातून तपासणे गरजेचे आहे अन्यथा दिल्लीकरांचा जीव रामभरोसे सोडलेलाच बरा.......

                       शुभम काकडे