माझ कवितेच जग

       माझ कवितेच जग





सातवीत असताना पतंगा रे पतंगा नावाचा एक मराठीचा धडा जाम आवडला होता.या धड्यातील एक लहानशी मुलगी पतंगावर कविता करत असते.मराठीच्या खुडे सरांनी अभ्यासाचा भाग म्हणून उद्या येताना एक कविता लिहून आणा असा टास्क दिला.सर्वांचीच जाम फाटली होती.थोड डोक लावून प्रज्ञाशोधला असल्यान भाषा विषयाच गाईड घेऊन बसलो आणि त्यातले समानार्थी जड जड शब्द एकाखाली एक रचले.सांगाडा तयार झाला की शब्द भरत गेलो. आणि नकळत आयुष्यातील पहील्या कवितेचा जन्म झाला.कविता पूर्ण आठवत नसली तरी तीचा पहीला भाग आठवतोय..

"श्रमश्री आहे त्याचे विहरणे
कोण न देई त्यास कणीक तिंबणे
हरवून जाती बघूनी पिकली पाने
जणू रंगाचे नटले तरू
फुलपाखरू फुलपाखरू"

शब्द जोडून कविता बनवण्याचा खेळ मला जाम आवडू लागला.कविता रचण यातच आनंद मिळून जायचा पण यामुळ एक गोष्ट साध्य झाली.वाचन करण आवडू लागल नवीन पुस्तक चाळण हाताळण आणि वाचून काढण हे अस सहावीपासूनच चालू झाल.  श्यामची आई एक होता कार्व्हर अग्निपंख बाबुलमोरा राधेय स्वामी स्मृतीचित्रे पानिपत छावा संभाजी बटाट्याची चाळ गोळाबेरीज अमृतवेल माझी जन्मठेप वगैरे बरीच पुस्तक वाचून झाली तर काही अर्धवटच राहिली ती अजून तशीच डोक्यात रेंगाळत असतात.एखाद पुस्तक हातात आल्यावरचा मिळणारा आनंद खरच आत्ता शब्दात व्यक्त करता येणार नाही.

कविता करण या काळातही चालूच होत.शाळेतल्या काव्यवाचन स्पर्धा आणि परिपाठ आम्ही गाजवू लागलो.एकदा तर विवीध गुणदर्शनाच्या आधी घेतलेल्या काव्यवाचन स्पर्धेचा नारळ फोडण्याचा मान दहावीत मुख्यध्यापकांनी मला दिला.सूत्रसंचालनाच्या डेस्कवरून जरा कावराबावरा होऊनच मी पुढे आलो आणि थरथरत दोन तीनदा आदळून नारळ फोडलाच.आयुष्यात अशी मोठ झाल्याची जाणिव बालवयात झाली.हा अनुभव अजूनही ताजा वाटतो.

व्याख्यान ऐकण,सह्या गोळा करण,नाणी गोळा करण,कात्रण जमवण असल्या उद्योगात रमू लागलो.रविवारचा सप्तरंग वाचण्यासाठी पेपरवाल्याची वाट बघत राहण, चंद्रगुप्त मौर्यावर कादंबरी लिहण्याचा संकल्प करण,बोक्या सातबंडे वाचून कथासंग्रह लिहून काढण असे डझनभर संकल्प करून मोडलेही असतील आता भूतकाळ आठवला की आपल्यावरच हसू येत.

दहावीपर्यंत जमलेली कवितांची भट्टी बारावीत तर पार शिगेला पोहचली.लेक्चर बुडवून लायब्ररीत प्रेमापासून मानवी उत्क्रांतीपर्यंत मारलेल्या बाताकम माहिती,अन वर्गात बसल्यावर फिजीक्स मॅथ केमेस्ट्रीच्या वह्यात कवितांची केलेली पारायण यामुळ पार वेड लागून गेल होत.बारावी झाल्यावर एका साहित्य संमेलनासाठी पूर्ण तयारीने गेलो.मला अजून आठवतय दोन दिवस झोप नव्हती आयुष्यातला जणू सुवर्णक्षण असावा अशी मी त्या दिवसाची वाट पाहत होतो.घसा बसलेला असताना दिवसात दहा वेळा गुळण्या केल्या अन शेवटी संमेलनाला गेलोच.कविता सादर केली कौतुक झाल नाव झाल महाराष्ट्रभर फिरलो नवीन माणस नवीन जग ट्राॅफ्यांचा ढिग लागला पण काहीतरी चुततय अस वाटू लागल.लहानपणापासून कवितेच माझ भाबड जग या कवींच्या मार्केटमध्ये गढूळ झाल.

साहित्य संमेलनाच्या नावाखाली चाललेली हजारो लफडी बघायला भेटली शेवटी या सगळ्याचा रामराम घेतला...

आता कविता रचावी लागत नाही तर ती नकळत जन्म घेते.मनावर ओझ वाटल,राग आला,चीड आली, मतपरिवर्तन झाल,पाॅझीटीव्हपणाचे डोस भरले कि नकळत हात पेनाकड वळतात.अलंकारीक म्हणू शकता पण लिहून खरच पूर्णपणे व्यक्त होता येऊ लागल.
पहिली कविता लिहून आता दहा वर्ष होत आली.तरी या कवितेन बरच काही दिलय.आता पुढच्या आयुष्यातही माझ्या व्यक्त होण्याला तेवढच प्रांजळपणे कविते तू साथ देशिलच...
जागतीक काव्य दिनाच्या तूला भरभरून शुभेच्छा...
मोठ्ठ होता नाही आल तरी प्रगल्भ होशील एवढीच अपेक्षा...

             शुभम काकडे